खोक्यांचा वाद कोर्टात जाणार? शिंदे गटाने दिला 'हा' इशारा

खोक्यांचा वाद कोर्टात जाणार? शिंदे गटाने दिला 'हा' इशारा

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून सत्तेत आलेल्या राज्य सरकारवर विरोधकांकडून ५० खोक्यांवरून आरोप करण्यात येत आहे. यावरून जोरदार वाद सुरु असून हा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

विजय शिवतारे म्हणाले, “काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

"हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीस दिल्या जातील.”

काही महिन्यापूर्वी शिवसेनेतील बंडानंतर '५० खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाज विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात विरोधकांनी केली होती. त्यानंतर त्यावरून आजपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना टीके लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. या टीकेला मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवराळ भाषेत उत्तर दिले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com