शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी!
शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

दिल्ली | Delhi

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता या पक्षाचे राज्याच्या राजकारणातील नेमके स्थान कोणते? हाच सवाल उत्पन्न झाला. त्यातच शिवसेना कोणाची हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) दारात जाऊन पोहोचला आहे.

औपचारीकरित्या जरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व असले तरी एकनाथ शिंदेआणि त्यांच्या गटाने शिवसेनेवर दावा सांगितला आहे. परिणामी, याच वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज (१७ जानेवारी) सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीत काय होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

निर्णय कधी लागणार?

शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद केला जात आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपण्याची शक्यता आहे. युक्तिवाद संपल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये आयोगाकडून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात आयोगाचा अंतिम निकाल लागू शकतो, असं सांगितलं जात आहे.

यापूर्वीच्या सुनावणीत काय झालं?

शिवसेना पक्षाच्या खटल्यात यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाची मागणी केली. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयीचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयीची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली होती.

तर सुप्रीम कोर्टाने अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नसल्याने शिवसेना चिन्हासंबंधी निर्णय घेण्यास हरकत नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे. तसेच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्ष प्रमुख पदाविषयी महत्त्वाचा युक्तिवाद केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी अवैधरित्या पक्षप्रमुख पद स्वतःकडे ठेवल्याचा दावा आयोगासमोर करण्यात आला.

दरम्यान यावर संजय राऊत म्हणाले, 'शिवसेना कुणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिले त्यावरुन हे कळते की काय होणार आहे. पण शिवसेना कुणाची हा प्रश्न महारष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचीच असले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना आहे.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com