Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. परंतू आरक्षणा अगोदर मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष राज्यसरकारवर जोरदार करत आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार

मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यासाठी त्यांनी बैठक बोलवली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. अन्य राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक

दरम्यान, मराठा आरक्षणला स्थगिती मिळाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मराठा आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती धक्कादायक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *