शरद पवारांनी साधला राज्यपालांवर निशाणा, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी लिहीलेल्या पत्रातील भाषेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली
शरद पवारांनी साधला राज्यपालांवर निशाणा, म्हणाले...

उस्मानाबाद | Osmanabad

थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्या पदावर रहायचे की नाही याचा निर्णय घेतील. असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, कोश्यारी यांनी आता राजीनामा द्यावा, असेच सुचित केले आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला देत राज्यपालांना टोला लगावला. केंद्रीय गृहमंत्र्यांनीच राज्यपालांनी वापरलेली ती भाषा पदाची प्रतिष्ठा वाढवणारी नक्कीच नसल्याचे मत व्यक्त केलं आहे असं पवार म्हणाले. पुढे बोलताना पवार यांनी आतापर्यंत आपण कोणत्याही राज्यपालांनी असं व्यक्त केल्याचं पाहिलं नसल्याचं म्हटलं. “१९५७ सालापासून चे सर्व राज्यपाल मी पाहिलेत. त्यानंतर १९६७ पासूनच्या सर्व राज्यपालांशी माझा थेट संबंध आला पण कोणी असं वक्तव्य केलं नाही,” असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच खुद्द केंद्रीय गृमंत्र्यांनीच कानउघाडणी केल्यानंतर या पदावर राहयचं की नाही हा विचार करावा, असंही पवार यांनी राज्यपालांचे नाव न घेता म्हटलं आहे.

राज्याच्या राज्यपालांनी पदावर रहावे की नाही याबद्दल तुमचे काय मत आहे असा प्रश्न यावर पत्रकारांनी पवारांना विचारला. “हे सांगणार मी कोण?,” असा प्रतिप्रश्न पवारांनी यावर उत्तर देताना विचारला. मात्र पुढे त्यांनी, “सेल्फ रिस्पेक्ट असणारा माणूस पदावर राहणार नाही,” असं म्हटलं. राज्यपाल, मुख्यमंत्री ही सर्व घटनात्मक पद असून त्याचा मान राखला गेला पाहिजे. राज्यपालांच्या पदाचा मान राखला गेला पाहिजे तसा मुख्यमंत्री पदाचाही मान राखला गेला पाहिजे. मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राज्यपालांकडून ठेवली जात नसेल तर हे चिंता वाढवणारं असल्याचंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन देण्यासाठी काही प्रश्न विचारे होते. 'राज्यात बार-रेस्टॉरंट सुरु झाले, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का?' अशाप्रकारच्या पश्नांचा त्यात समावेश होता. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com