सत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’- शरद पवार
राजकीय

सत्तेचा पुरेपूर गैरवापर म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’- शरद पवार

पाच वर्षे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई - ‘ऑपरेशन लोटस’ हे दुसरे-तिसरे काही नसून सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे. केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणे म्हणजेच ऑपरेशन लोटस आहे, अशी टीका राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर केली आहे.

शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनासाठी दिलेल्या मुलाखतीत ऑपरेशन लोटसबाबत भाष्य केले आहे. ऑपरेशन लोटस याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डीस्टॅबिलाईज (अस्थिर) करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटसनुसार राज्यातील ठाकरे सरकार पाडणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊतांच्या या प्रश्नावर शरद पवारांनी ऑपरेशन लोटस असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असं म्हटलं. पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते. नंतर आता सहा महिने झाले. आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा वायदा करताहेेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन लोटस असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही सत्तेतील सरकारच्या अस्थिरतेसाठी ऑपरेशन लोटस सुरू आहे. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवले जाण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या ऑपरेशन लोटसवर शरद पवार यांनी सडकून टीका केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com