कोण म्हणत मी म्हातारा झालो?; शरद पवारांची तुफान फटकेबाजी

शरद पवार
शरद पवार

पुरंदर | Purandar

महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या सरकारने धोरण करायला हवं पण ते करत नाहीत. मी दिल्लीत गेलो की विनंती करतो. एक तरुण शेतकऱ्याने विनंती केली की घराबाहेर पडू नका, आता मी म्हातारा झालोय का? असं काय पाहिलं? असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शरद पवार बोलताना म्हणाले, मी आता बाहेर फिरू नये असं एकानं सांगितले. पण कुणी सांगितले मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा झालो नाही. वय वाढते. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे. १९८४ ला मी लोकसभेला पहिल्यांदा उभा होतो तेव्हापासून सुप्रिया सुळे, अजित दादा, संजय जगतापांची निवडणूक असेल प्रत्येक वेळी सासवडच्या लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.

तसेच, माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा मी फळबाग योजना काढली. तेव्हा शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य केले. आंबे, काजू कोकणात हजारो शेतकरी उत्पादन घेतात. कोकणातला शेतकरी १६-१८ वय झाले तर मुंबईकडे कामाला जायचे. ६० वय झाल्यानंतर गावाकडे परतायचे. शेती फारसी नव्हती. आज मुंबईला जाण्याची भूमिका कोकणच्या लोकांची नाही. फळबाग योजनेचा फायदा घेत काजू, आंबा, फणस उत्पादन कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात कशा पडतील यासाठी प्रयत्न करू असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, गेल्या १० वर्षात भू विकास बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले आहे का? कुणी वसूलीला जात नाही. जिथे वसूली होणार नाही तिथे भू विकास बँकेचे कर्ज माफ केले अशी घोषणा राज्य सरकारने २-३ दिवसांपूर्वी केली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेळ पडल्यास संघर्ष करू. मोर्चा काढायचा, मागणी करायची. जुने दिवस विसरायचे कारण नाही. पिकांचे जे नुकसान झालंय त्याची भरपाई केंद्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com