अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले "कोणाला काहीही आवडेल पण...

अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले "कोणाला काहीही आवडेल पण...

नाशिक | Nashik

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर आता खुद्द शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल. पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, तेवढी संख्याही नाही. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले. सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी संस्था नोंदणी करताना आता भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावर पवार म्हणाले की, केंद्राच्या विसंगत राज्य सरकारचे प्रतिनिधी धोरण मांडत आहे. भाजपाने त्यांच्या पक्षात काय करावे त्यांचा प्रश्न असून केंद्राच्या सहकार परिषदेत सावेंचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा ठराव भाजपच्या बैठकीत करण्यात आला. यावर पवार म्हणाले की, अनिल देशमुख एक वर्ष जेलमध्ये होते. संजय राऊत देखील जेलमध्ये होते. नवाब मलीक आजही जेलमध्ये आहेत. राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भुमिकेचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. काँग्रेसमध्ये वाद होत आहेत. यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद होत आहेत यावर ते म्हणाले की, मविआमध्ये कुठलाही वाद नाही, चर्चा होत असतात.

निलेश लंके काय म्हणाले होते?

आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे. जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील. असे निलेश लंकेनी म्हटले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com