अजित पवारांच्या 'त्या' निर्णयाचं शरद पवारांनी केलं स्वागत

अजित पवारांच्या 'त्या' निर्णयाचं शरद पवारांनी केलं स्वागत

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मराठा समाजाने राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यात बारामतीत अजित पवारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. माळेगाव साखर कारखानाच्या गळीप हंगामाची सुरूवात आजपासून होतेय. याठिकाणी मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु मोळीपूजनाला अजित पवारांनी येऊ नये असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला.

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. त्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक माळेगाव साखर कारखाना परिसरात जमले होते. परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोळीपूजनाला जाणे टाळले. शेतकऱ्यांच्या हातून मोळीपूजन करा अशा सूचना अजितदादांनी कारखाना प्रशासनाला दिल्या. अजित पवारांनी माळेगावला न जाण्याचा निर्णयाचं शरद पवार यांनी स्वागत केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, लोकांच्या मराठा आरक्षणाबाबत काही भावना असतील तर अशावेळी तिथे संघर्ष टाळणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. माझ्या मते, अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं त्यांनी म्हटलं. तर आमचा विरोध अजित पवारांना नव्हे तर ६ राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांना आहे. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आरक्षणाप्रश्नी आम्ही त्यांना अडवले होते. ६ वर्षांनी अजित पवारांना अडवण्याची वेळ आमच्यावर राजकारण्यांनी आणली आहे. सध्या आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील आहे. ते जे भूमिका सांगतील ती आम्ही पुढे घेऊन चाललो आहे असं मराठा आंदोलकांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवार असो वा राजकीय नेते कुणालाही राजकीय कार्यक्रम घेऊन देणार नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर राखावा. जर तरीही नेत्यांनी प्रवेश केला तर कारखान्यावर भगवं वादळ पाहायला मिळेल. या नेत्यांना पाऊल ठेऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून आम्ही आंदोलन करतोय. महिला, ज्येष्ठ, तरूण सगळेच आंदोलनात सहभागी झालेत. यावर जर दडपशाही करून आंदोलकांवर गाड्या घालायचे असतील तर ते अजित पवारांनी ठरवावे. आमचे आंदोलन पूर्ण शांततेने असेल असंही मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com