
मुंबई | Mumbai
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकारण पेटलं आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याने यावर 'जनता जमालगोटा देईल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
विरोधकांमध्ये आजच्या कार्यक्रमामुळे पोटदुखी सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विरोधकांना जनता जमालगोटा देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. काही लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला होता.
एकनाथ शिंदे यांच्या जमालगोटा वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पवारांनी चांगलाच टोला लगावला. याबाबत पत्रकारांनी असता ते म्हणाले, त्यांची भाषा त्यांनाच शोभते त्यावर बोलणं उचित नाही, त्यांच्या बुद्धीला जे पटते, ते बोलतात, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंनी केलेल्या ‘जमालगोटा’ विधानावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदेंनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सुसंस्कृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या मान्यवरांनी कसं बोलायचं असतं याचे काही संस्कार आपल्यावर केले आहेत. पण हे जमालगोटा वगैरे मुख्यमंत्र्यांना तरी हे शब्द पटतात का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
नवीन संसद हे अतिशय रेकॉर्ड वेळेत पूर्ण झाले आहे. 2019 मध्ये सुरुवात झाली आणि 2023 मध्ये या वास्तूचे लोकापर्ण होत आहे. ही संपूर्ण देश आणि जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे संसदेच्या लोकार्पण प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. परंतु काही लोकांकडून विरोध केला जात आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. विरोधक नेमकं लोकशाहीला विरोध करीत आहेत की मोदींना? विरोधकांना जी पोटदुखी सुटली आहे, त्याचा इलाज आता जनताच जमालगोटा देऊन करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.