राज्याच्या राजकारणात खळबळ; शरद पवार आणि अमित शहांची भेट?

राज्याच्या राजकारणात खळबळ; शरद पवार आणि अमित शहांची भेट?

मुंबई | Mumbai

परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

या भेटीच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

'शरद पवार व अमित शहा यांच्यात भेट झाली नाही. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले आहेत. त्यांच्यात भेटच झाली नाही,' असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, 'गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसंच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रानं दिली आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला आहे.

तसेच, विरोधी पक्षामुळे गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. पवार यांनी अनिल देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेदहापर्यंत शरद पवार अहमदाबादमध्ये होते, अशी माहिती मिळतेय. योगायोग म्हणजे याच दिवशी अमित शाहसुद्धा अहमदाबादमध्ये होते. ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com