सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवार म्हणतात...

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवार म्हणतात...

मुंबई -

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमात मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे विधान केले होते. त्यानंतर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर टीका-टिप्पण्या देखील केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत रंगलेल्या चर्चेला शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस असून देशपातळीवर काम करण्याची आवड आहे. त्यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार देखील मिळले आहेत. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवर काम करण्याची आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगल्या होत्या. तर शरद पवारांवर राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित दादा किंवा सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार आणि आशिष शेलार यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी आशिष शेलार यांनी शरद पवारांसमोरच कर्तृत्ववान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचेही शंभर टक्के समर्थन असू शकते, असे विधान करत आशिष शेलार यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com