'त्या' विधानामुळे महाराष्ट्रात उद्रेक होईल; शिंदे गटातील नेत्याचा अजित पवारांना इशारा

'त्या' विधानामुळे महाराष्ट्रात उद्रेक होईल; शिंदे गटातील नेत्याचा अजित पवारांना इशारा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यातच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना जुनं उकरून ना काढण्याचा सल्ला दिला. तसेच, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते असं अजित पवार म्हणाले. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शंभुराजे देसाई म्हणाले, 'अजितदादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याच्या आधी हे बोलले असते, तर साहेबांनी त्यांना आधीच उत्तर दिलं असतं. छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्य रक्षक म्हणा धर्मवीर म्हणू नका हे अजित दादांच बोलणं चुकीचं आहे. त्यांना धर्मवीर हे नाव आज नाही तर इतिहासानं दिलेलं आहे. संभाजीराजेंनी हिंदु धर्म रक्षणासाठी देहाचं बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणायला पाहिजे,' असं शंभुराजे देसाईंनी म्हटलं आहे.

तसेच, 'एकीकडे महापुरूषांचा आदर करा असं सांगायचं आणि दुसरीकडे संभाजीराजेंना धर्मवीर म्हणू नका असं म्हणायचं, हे चुकीचं आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञात स्वत: मात्र कोरडे पाषाण अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांचं आहे. त्याची निंदा करावी तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि दादांना लक्षात येईल आपण बोललो हे चुकीचे आहे', अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली.

काय म्हणाले होते अजित पवार?

'मागच्या काळात झालं ते गंगेला मिळालं. आता ते कशाला उकळत बसायचं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघत नाही. नव्या वर्षात राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही निर्णय घ्या की ‘हे कुणी काही बोलत असतील तर माझे प्रवक्ते वगैरे त्यावर बोलतील’, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले. तसेच, यावेळी बोलतानात्यांनी संभाजी महाराजांचाही उल्लेख केला. 'छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली', असंही अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com