मोदीजी, कहाँ गये वो 20 लाख करोड
राजकीय

मोदीजी, कहाँ गये वो 20 लाख करोड

सत्यजित तांबे : 10 तारखेपासून युवक काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

लॉकडाऊन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले होते. गेल्या तीन महिन्यांत त्याचा प्रत्यक्ष किती लाभ झाला, याची पाहणी करण्यासाठी आणि केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. 10 ते 14 ऑगस्ट या काळात राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

युवक काँग्रेसचं आंदोलन अनोख्या पद्धतीने केलं जाणार आहे. आंदोलनात दररोज वेगवेगळ्या घटकांतील लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे याचा लाभ मिळाला का, अशी चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर यातून संकलित झालेली माहिती, प्रतिक्रिया जाहीर करून कहाँ गये वो 20 लाख करोड असा प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यात येणार आहे.

सत्यजीत तांबे यांनी या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी 12 मे रोजी घोषणा करून हे 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पत्रकार परिषदा घेऊन आकडेवारीसह योजना जाहीर केल्या होत्या. याला आता तीन महिने झाले असून जाहीर केलेले हे पॅकेज कोठे गेले, त्याचा खरच लाभ मिळाला का?, हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. त्यामुळेच याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन छेडण्यात येत आहे, असे तांबे यांनी नमूद केले.

10 ते 14 ऑगस्ट या काळात दररोज वेगळ्या घटकातील लोकांना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भेटणार आहेत. सुरूवात शेतकर्‍यांपासून होईल. 10 तारखेला राज्यभर शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना या 20 लाख कोटींचा काही फायदा झाला का, हे विचारले जाईल. त्यांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या जाणार आहेत.

त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात फोन करून आणि पत्र पाठवून याबद्दल विचारणा केली जाणार आहे. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापार्‍यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? यांची विचारणा केली जाणार आहे, असे तांबे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com