
नाशिक | Nashik
विधान परिषदेच्या (MLC Election 2023) नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी बाजी मारली आहे. पाचव्या फेरी अखेर तांबे यांना तब्बल ६८ हजार ९९९ मतं मिळाली तर शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना ३९ हजार ५३४ मतं पडली. मतमोजणी संपल्यानंतर तांबेंनी तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले.
या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात”, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
“माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मनं जिंकण्याचं काम केलं. हाच ऋणानुबंध पुढे नेण्याचं काम मी करेन. सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत मी ४ तारखेला म्हणजे उद्याच मी पुढील भूमिका स्पष्ट कारेन”, असं यावेळी तांबेंनी नमूद केलं.
गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला.
दरम्यान सत्यजित तांबे यांनी विजयाचा जल्लोष केला नाही. याबाबत काल त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. ते म्हणाले, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत. पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव करणार नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून केले आहे.