
मुंबई | Mumbai
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency Election) काँग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती...
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. तांबेंनी माघार घेत त्यांच्याऐवजी पुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कॉंग्रेस हायकमांडने याप्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली.
आता सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून तशा सूचना देण्यात आल्याचे समजते. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिल्या आहेत, असे सूत्रांकडून समजते.
दुसरीकडे भाजपही त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत असली तरी जोपर्यंत तांबे यांच्याकडून अधिकृतरित्या पाठिंबा मागितला जात नाही तोपर्यंत भाजप त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी सांगितले आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, 'मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजले आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले आहे.