‘त्या’ ट्विटवरून संजय शिरसाटांचा यू-टर्न, म्हणाले...

‘त्या’ ट्विटवरून संजय शिरसाटांचा यू-टर्न, म्हणाले...

मुंबई | Mumbai

शिंदे गटात (Eknath Shinde) सामील झालेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला. या ट्विटची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा झाली. मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट हे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या.

दरम्यान, संजय सिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मी उद्धव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख करून जे ट्वीट केले तो मोबाईलचा टेक्निकल एरर होता. जुने मार्च महिन्यात ड्राफ्ट केलेले ट्वीट चुकून आता ट्विटरवर दिसू लागले; असे संजय शिरसाट म्हणाले. एका ट्वीटमुळे बराच गोंधळ झाला. यामुळे आता मोबाईल वापरू नये किंवा बंद ठेवावा असंही वाटत असल्याचे शिरसाट मिष्कीलपणे म्हणाले.

राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात. मंत्री व्हावे असे अनेकांना वाटते. पण काही वेळा राजकीय समीकरणे सांभाळणे महत्त्वाचे असते. यामुळे माझे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून आधी चर्चेत होते. पण नंतर काही समीकरणे जुळविताना नाव मागे पडले असे शिरसाट यांनी सांगितले. जे मंत्री पद सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यांना प्राधान्य देणे आवश्यक होते त्यामुळे त्यांना आधी कॅबिनेट मंत्री केले आहे. लवकरच खातेवाटप जाहीर होईल. पुढच्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

शिरसाट यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेतील एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केला होता. अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना, आम्ही दिलेलं वचन पाळतोच आणि दिलेला शब्द खरा करून दाखवतो, असं म्हणाले होते. या व्हिडीओमुळे शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिल्याची चर्चा रंगली होती. पण शिरसाट यांनी लगेच ट्वीट डिलीट केलं होतं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com