Friday, April 26, 2024
Homeराजकीयरेल्वे भाजपची मालमत्ता आहे काय?

रेल्वे भाजपची मालमत्ता आहे काय?

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

कोरोना प्रतिबंधित लसी संदर्भात (Corona Vaccine) सर्व डाटा राज्य सरकारकडे असल्यामुळे लोकल प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्याने घ्यावी, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी व्यक्त केल्यानंतर दानवे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली…

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांचे हे राजकारण आहे की अकार्यक्षमता हे आपल्याला माहिती नाही असे सांगत त्यांच्यावर टीका केली, तर रेल्वे ही काय भाजपची (Bharatiya Janata Party) खासगी मालमत्ता आहे काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

लोकल प्रवास (Mumbai local train) १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात बोलताना राज्य सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असे म्हटले आहे.

याशिवाय राज्य सरकारकडे (Maharashtra State Government) दोन लसी घेणाऱ्यांची आकडेवारी असल्याने त्यांनीच त्यांच्या प्रवासाची जवाबदारी घ्यावी असेही म्हटले आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदाच ही जबाबदारी घेणार कोण? अशाप्रकारचा प्रश्न रेल्वेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच आधी जे रेल्वे मंत्री होते त्यांनी जबाबदारीने काम केले होते.

मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सूचवल्याप्रमाणे त्यांनी त्या केल्या होत्या. आता दानवेंचा लसीकरणाला विरोध आहे का? त्यांचे राजकारण आहे की अकार्यक्षमता आहे हे मला माहित नाही. आतापर्यंत आम्हाला यात सहकार्य मिळाले असून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीही यात आम्हाला सहकार्य करतील अशी आमची खात्री आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्हाला कोणत्याही वादात जायचे नाही. रेल्वे आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्हाला श्रेयवादात न पडता जनतेसाठी काम करायचे आहे. ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावे. महाविकास आघाडीचे सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्याहून महत्वाचे म्हणजे लोकांचे जीव जाऊ नये असे आम्हाला वाटते, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांनीही दानवेंच्या विधानावर टीका केली. काही लोकांना रेल्वे ही राष्ट्राची नव्हे, तर पक्षाची खासगी मालमत्ता असल्याचे वाटते. मुंबई लोकल सुरु करावी, यासाठी सर्वात मोठे आंदोलन भाजपने उभे केले. तातडीने रेल्वे सुरु करा, अशी मागणी दानवे करत होते. आता प्रत्यक्ष लोकल सुरू झाल्या तर दानवेंची भाषा कशी बदलली? असा सवालही राऊत यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या