
नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकारावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे खेळ सुरू आहेत. कारण आज जे सत्तेवर आहेत, ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आले आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा नाही. नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचं असा कट दिसतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
तसेच, आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील. आम्ही ढोंगी नाही. त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तिथे कधीही अशा घटना घडल्याचे माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू केलं आहे. असंही ते म्हणाले.
मुस्लीम समाजाचे सुफी संथ गुलाब शाह यांचा उरुस निघतो. गेल्या १०० वर्षांपासून ही परंपरा आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात. त्यानुसारच हे झालंय. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. हे फक्त आपल्याकडे नाही. अजमेर शरीफच्या दर्ग्यावर, माहिमच्या दर्ग्यावर, हाजीअलीच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदू जात असतात त्यात संघाचेही लोक असतात. तिथे पोलिसांकडूनही चादर चढवली जाते. हा श्रद्धेचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.