
मुंबई | Mumbai
शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे की, एक वेळ अशी आली, घाणेरडे आरोप-प्रत्यारोप झाले, राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी देखील तेच केलं आहे. परंतु जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. शरद पवार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.