
नाशिक | Nashik
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आज मालेगाव येथे सभा होत आहे. खेडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्यानंतर प्रतिउत्तरादाखल एकनाथ शिंदे यांनीही खेडमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आता मालेगावात ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. या सभेपुर्वीच मालेगावचे वातावरण चांगलेच तापले आहे.
सगळीकडे सभेची चर्चा आहे
या सभेविषयी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष आहे. ही सभा अशी आहे जिकडे भाड्याने कोणी येणार नाही. ३०० रूपये ५०० रूपये रोजावर जी माणसे आणली जातात, ती मुख्य भाषण सुरू झालं की निघून जातात, समोर कोण बोलतोय ते माहीत नाही, कशासाठी आलो ते माहित नाही, अशी टीका राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
दादा भुसेंना दिला इशारा
दादा भूसे यांनी गिरणा सहकारी कारखान्याचा १७८ कोटीचा हिशोब तयार ठेवावा. त्यांनी आमच्याकडे पाहू नये, लोकं हिशेब मागतील, अशी टीका देखील संजय राऊत यांनी भूसे यांच्यावर केली. तसेच कोणत्याही दिशेला शिंदे यांनी सभा घ्यावी. काहीही होणार नाही कारण त्यांची दुर्दशा झालीय असाही टोला त्यांनी लगावला. पोलिसांनी मार्ग बदलण्याची सूचना केली असली तरी आम्ही त्याच मार्गाने येणार, आम्ही कधी सुरक्षा मागत नाही, आम्हाला कोणापासून धोका नाही, असे देखील राऊत म्हणाले आहेत.
देशात दोन वेगवेगळे कायदे तयार झाले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यावर संजय राऊत म्हणाले, या देशात पक्षांतर करणारे महाराष्ट्रातील १६ आमदार अपात्र ठरवले जात नाही. निवडणूक आयोग बेईमानाच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देते. पण राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासात रद्द केली जाते. या देशात दोन वेगवेगळे कायदे तयार झाले आहेत. विरोधकांसाठी वेगळे कायदे. भाजपसाठी वेगेळे कायदे. बेईमानांसाठी वेगळे कायदे तयार झाले आहेत.
महाराष्ट्र आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का?
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ऊर्दू भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्दू भाषेतील पोस्टरचे संजय राऊत यांनी समर्थन केले असून, महाराष्ट्रा आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावे, यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातील काही बॅनरवर ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’, लिहिले असल्याचे सांगितले जात आहे.