Friday, April 26, 2024
Homeराजकीय'पवार-शहा' भेटीच्या चर्चेवर काय म्हणाले संजय राऊत?

‘पवार-शहा’ भेटीच्या चर्चेवर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई | Mumbai

परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याची चर्चा आहे. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावलं आहे, तर शाह यांनी सूचक विधान करत भेटीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. दरम्यान, या सर्व चर्चा व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. तसेच, काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजे, नाहीतर भ्रम निर्माण होतो. मी विश्वासाने सांगू शकतो की, शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अहमदाबाद किंवा कुठही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी अफवा संपवा, याने हाती काहीच लागणार नाही.’ असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

या अगोदर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात, असे संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. देशात महाराष्ट्राचं नाव खराब झालंय, या घटनांवरुन सध्या महाराष्ट्र बदनाम झालाय, जे व्हायला नको. महाराष्ट्राला देशात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे.’

तसेच, ‘माझं कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं काम उत्तम सुरू आहे. फक्त, विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केलं जातंय, ते करुन देण्याची संधी विरोधकांना देऊ नये, हेच मला सांगायचं होतं, असे रोखठोक स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय. तसेच, महाविकास आघाडी सरकार स्थिर असून पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत,’ असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भेटीचा सस्पेन्स काय आहे. दिल्लीत शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पवारांसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “सगळ्याच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत”, असं उत्तर शाह यांनी दिलं. त्यामुळे पवार-शाह यांची भेट झाली की, नाही? हा सस्पेन्स मात्र कायम आहे.

या भेटीच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

‘शरद पवार व अमित शहा यांच्यात भेट झाली नाही. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले आहेत. त्यांच्यात भेटच झाली नाही,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसंच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रानं दिली आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला आहे.

तसेच, विरोधी पक्षामुळे गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी सरकारला सातत्यानं अडचणीत आलं आहे. पवार यांनी अनिल देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या