
मुंबई | Mumbai
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी चौफेर टीका करत भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा मार्ग मोकळा करत आहे, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनी पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
'आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे,' असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
'मी तुमच्यासारखा ईडीने बोलवल्यावर पळून गेलेलो नाही. मी शरणागती पत्करलेली नाही. आम्ही नामर्द नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झाले आहात का? कोण काय बोलतंय तसेच प्रत्येकाचे वक्तव्य आम्ही सरन्यायाधीशांना पाठवत आहोत. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार नाहीत,' अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत राऊत म्हणाले की, 'आदित्यनाथ यांच्याविषयी आज आम्ही आग्रलेख लिहिला आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. मुंबई देशाचं पोट भरते. येथे देशभरातून लोक पोट भरण्यासाठी येतात. आम्ही त्यांना प्रेमाने सांभाळतोच,' असंही राऊत यांनी नमूद केलं.
नारायण राणे काय म्हणाले होते?
नारायण राणेवर बोलले की पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज होते. याचमुळे सामनाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते मी वकीलाकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणारा नाही दखल घेणारा आहे. माझा स्वभाव वाईट असल्याचा टोला राणे यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच २६ डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवलाय. त्यातील प्रत्येक वाक्य न वाक्य मी लक्षात ठेवले आहे. संजय राऊतला मी सोडणार नाही. त्याच्यावर लवकरच केस दाखल करणार. संजय राऊतने १०० दिवस तुरुंगात घालवले. ते कमी पडलेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी रस्ता मोकळा करत असल्याचा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे.