“दिल्लीश्वरांनी गुंगीचं औषध…”; ‘नॅनो मोर्चा’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

“दिल्लीश्वरांनी गुंगीचं औषध…”; ‘नॅनो मोर्चा’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीकडून काल मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या मोर्च्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो मोर्चा’ असल्याची टीका केली होती. फडणवीस यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर देत हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, 'खरे तर शिंदे गटाच्या आमदारांची बुद्धी नॅनो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. महामोर्चाला नॅनो म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीची अवहेलना करू नये. तसेच, महापुरुषांच्या अवमानावर, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीच बोलत नाहीत. त्यांना शांत राहण्याच्या अटीवरच मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांना दिल्लीतून गुंगीचे औषध देण्यात आले आहे. गुंगी संपते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत जातात,; अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली.

तसेच, 'देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मोर्च्याचे स्वागत करायला हवे होते. तसेच त्यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकारविरोधी नव्हता, हा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता. त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची जनता काल एवटली होती. मात्र, तुम्ही ज्या भाषेत त्यांच्या विरोधात बोलत आहात, हे राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही', असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com