संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या "आजी-माजी-भावी" विधानामागचा नेमका अर्थ, म्हणाले...

संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या "आजी-माजी-भावी" विधानामागचा नेमका अर्थ, म्हणाले...

मुंबई (Mumbai)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केला होता. यावेळेस व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा या विधानावरून भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कालच्या विधानानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार.'

तसेच, 'शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवसेना पाठीत खंबीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल या भ्रमात कुणीही राहू नये. कुणाला पतंक उडवत बसायचं असेल तर त्यांनी उडवावी तो पतंग कधी कापायचा हे माम्हाला माहिती आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर, 'ज्या पक्षातील नेत्यांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा केली. ज्या पक्षातील लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरतात. कानाखाली मारण्याची भाषा करतात अशा पक्षासोबत हातमिळवणी कशी करू. उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं आहे की, कुणीतरी इथे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी" असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनैसर्गिक आघाडी फार काळ टिकून राहात नाही. महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तसे वाटले असेल, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्या वक्तव्याला मी फारसे महत्त्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहे. त्यांनी काय बोलावे, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना थट्टा मस्करी करण्याची सवय आहे. भाजप नेत्यांचा तणाव कमी करण्यासाठी ते असे बोलले असतील. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com