भाजपाच्या सहवासात आल्यापासून मुख्यमंत्री खोट्या शपथा घेऊ लागले; संजय राऊतांची टीका

भाजपाच्या सहवासात आल्यापासून मुख्यमंत्री खोट्या शपथा घेऊ लागले; संजय राऊतांची टीका

मुंबई | Mumbai

दसऱ्यादिवशी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्या आहेत. या सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपासह भाजपाकडून होणाऱ्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दसरा मेळाव्याच्या भाषणात छत्रपती शिवरायांची शपथ घेतल्यावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. भाजपच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१४साली म्हणत होते शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदींबरोबर आहे. तेव्हापासून शिवरायांचं नाव राजकारणात वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. कसल्या शपथा घेताय तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करायची, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मराठी माणसाच्या एकजुटीला तडा द्यायचा आणि वर छत्रपतींची शपथ घ्यायची? हे सगळं भाजपच्या इशाऱ्यावर काम करणे सुरू आहे, असा आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला.

यांना स्वत:चा आचार-विचार राहिलेला नाही. जे भाजप सांगेल तेच. काही दिवसांनी हे डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील. शिंदे गटाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. म्हणे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत वगैरे. शेवटचा थेंब असेपर्यंत हे शिवसेनेत राहणार होते. राहिले का? भाजपा आमचा छळ करतंय सांगत जाहीर सभेत राजीनामा देणारे हे. आता भाजपने त्यांना मांडीवर घेतले, असेही राऊत यावेळी म्हणाले. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा अशी सभा घेऊन दाखवा. आम्हाला न्यायालयाचाही निर्णय नको. गरज नाही आम्हाला त्याची. जनतेच्या न्यायालयात चला. निवडणूक घ्या. तिथे ठरेल कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी ते, असेही राऊत म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com