
मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे...
संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन 'इंडिया आघाडी'ची स्थापना केल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २०२४ च्या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी भाजपला (BJP) आत्मविश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष फोडणे सुरू केले आहेत. पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, असे विधान त्यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, मणिपूरसारख्या (Manipur) राज्यात चीनचा हस्तक्षेप असल्यामुळे दंगे होत आहेत, असे या देशाचे माजी लष्करप्रमुख समोर येऊन सांगतात. अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जबाबदारी आहे की, देशाला मणिपूर संदर्भातील त्यांच्या मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी.
महाराष्ट्र सदनामध्ये एनडीएमधील सर्व खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुळात एनडीए आहेत तरी कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेतून (Shivsena) तुटलेला एक गट, राष्ट्रवादीतून तुटलेला एक तुकडा आणि मग इतर सगळे गोळा केलेले ताकडे-तोकडे जुळवले आहेत, मूळ एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल, जनता दल, एआयडीएम, तृणमूल काँग्रेस या मुख्य पक्षांनी उभा केलेला एनडीए कुठे आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना बैठक घेऊ द्या, पण लक्षात ठेवा एनडीएचा (NDA) सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, तो इतिहासातला सर्वात मोठा पराभव असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.