
मुंबई । Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावरून आक्रमक होत संजय राऊत यांनी ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीत काही सांकेतिक नावं आहेत. ही नावे कुणाची आहेत हे आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर याप्रकरणाची एसआयटी चौकशी लावा, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला दिला आहे.
ठाण्यातील बिल्डरच्या आत्महत्याप्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी.'
तसेच, 'राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे.मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधीपक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नव्हतं,' असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.