
मुंबई | Mumbai
काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी २०१९ साली पहाटे शपथ घेत काही तासांचे सरकार स्थापन केले. शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा झाल्यानंतरच हे सरकार स्थापन झाले होते असे त्यांनी स्पष्ट केले...
त्यांच्या या वक्तव्याचा आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाचार घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्या प्रकारची वक्तव्य देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून येत आहे. ते पाहून वाटते की, देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहे. ८ आश्चर्य या जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत असून एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, माणसाने किती खोटे बोलावे याला मर्यादा असतात, मुळात तुम्ही विश्वासघात केल्याने हे घडले आहे. फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वत: अमित शाहांसमोर (Amit Shah) काय बोलले होते? त्यामुळे स्वत:च विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काय अर्थ आहे.
उद्या फडणवीस म्हणतील सहा महिन्यापूर्वी जी बंडखोरी झाली ती शरद पवारांच्या सांगण्यावरून झाली. एका वैफल्यातून ते बोलत आहेत. राज्यात त्यांच्या सरकारविषयी तिरस्कार आहे. विधानपरिषेदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.