Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या...तर आम्हाला कोथळा काढण्याचा अधिकार

…तर आम्हाला कोथळा काढण्याचा अधिकार

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

भाजपकडून गोबेल्स नीतीने विरोधकांची बदनामी करण्याचे कारस्थान 2014 पासून सुरू झाले आहे. आपण मात्र नैतिकता सांभाळत बसलो आहे. पश्चिम बंगाल, गुजरातच्या निवडणुकीतही त्यांनी हेच केले. याला जर युद्ध म्हणत असतील आणि त्याची नैतिकता पाळत नसतील तर आपल्यालाही त्यांचा कोथळा काढण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी भाजपवर हल्ला चढवला.

- Advertisement -

तुमच्यासारख्या तरुणांच्या खांद्यावर आता शिवसेनेचे भवितव्य आहे. तेव्हा कोणत्याही परिणामांची पर्वा न करता भाजपचा प्रत्येक हल्ला, प्रत्येक खोट्या प्रचाराला त्याच पद्धतीने उत्तर द्या, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

शिवसेनेचा सोशल मीडिया सैनिक मेळावा आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे पार पडला. युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतानाच तरुण शिवसैनिकांना भाजपच्या गोबेल्स नीतीचा सामना करण्याचा कानमंत्र दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास पुढे न्यायचे काम हे आता तरुण पिढीचे आहे. शिवसेना एक महासत्ता आहे. भाजपच्या हातून हे राज्य आपण घेतले आहे. ते राज्य आपल्याला कायम राखायचे असेल तर विरोधकांची रणनीती आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्यांच्या खोट्या प्रचाराला त्याच पद्धतीने, प्रखर शब्दांत उत्तर द्यायला हवे. भाजपच्या तुलनेत आपली सोशल मीडिया टीम छोटी आहे, तिची ताकद वाढवायला हवी, असेही राऊत म्हणाले.

भाजपने जी गोबेल्स नीती अवलंबिली आहे. तो गोबेल्स हिटलरच्या सैन्यात होता. 100 वेळा खोटे बोललो की ते खरे वाटू लागते.हीच त्या गोबेल्सची नीती भाजपकडून अवलंबिली जात आहे. जर्मनीचा हुकूमशहा हिटलर शिवसेनाप्रमुखांनाही आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याच प्रकराचरचे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत. मी टीका करत नाहीय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी अमित शहा यांनी सोशल मीडियासाठी 1 कोटी लोक तैनात केले. ममतांविरोधात पोस्ट टाकण्यासाठी आणि 50 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य त्यांना देण्यात आले होते, असा दावा राऊत यांनी केला.

त्यावेळी सत्तेत असूनही मंत्रिपद घेतले नाही ही राहुल गांधी यांची चूक झाली.पण राहुल गांधींना फेल ठरवण्यात भाजपच्या सोशल मीडियाचा मोठा हात आहे. भाजपच्या या आयटी सेलला संघ परिवाराच्या माध्यमातून पैसा दिला जात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपचा दांभिकपणा लोकांसमोर आणा : अरविंद सावंत

सोशल मीडिया हे आपल्या हातातील एक आयुध आहे. त्या आयुधाचा वापर आपल्याला करायलाच हवा. शिवसेना हा एक ब्रँड आहे तो देशभक्तीचा ब्रँड आहे. एकीकडे महागाई, बेरोजगारी वाढलेली असताना, त्यावर उपाय न करता धर्माच्या नावावर भाजपने राजकारण सुरू केले आहे. भाजपचा हा भंपकपणा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणायला हवा, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या