
मुंबई | Mumbai
भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाहांवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते अमित शाह आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनीच शिवसेना फोडली आहे. मुंबईचा ताबा घेण्यासाठी आणि मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व कमी करण्यासाठीच अमित शाह यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत बोलतांना म्हणाले, 'शिवसेनेसारखा पक्ष फोडणं आणि शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करणं, मुंबईवर शिवसेनेची आणि मराठी माणसाची पकड ढिली करणं हे भाजपचं गेल्या अनेक वर्षापासूनचं टास्क आहे. ते त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करायचं असेल तर शिवसेना फोडली पाहिजे, हे त्यांच्या मनात होतं. पण शिवसेना अशी फुटू शकत नाही हेही त्यांना माहीत होतं. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यासह पाच सहा लोकांचा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांची ताकद पाच ते सहा आमदारांपेक्षा अधिक नसावी. पण नंतर जे चित्र तयार झालं. ते करण्यात भाजपचं दिल्लीचं नेतृत्व आघाडीवर होतं. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव करून हा पक्ष फोडण्यात आला,' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कल्याणमधून लोकसभेवर पूर्वी निष्ठावान शिवसैनिक खासदार म्हणून निवडून येत होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी ती जागा आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मागितली. उद्धव ठाकरे यांनी औदार्य दाखवत श्रीकांत शिंदेंना दोनदा तेथून खासदार म्हणून निवडून आणले. पण, उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे फाजिल लाड केले, हे नंतर कळाले. केवळ कल्याणच्या जागेसाठी नव्हे तर भाजप एका-एका जागेसाठी शिंदे गटाला असाच रडवेल व हळूहळू नष्ट करून टाकेल. त्याची सुरूवात आता झाली आहे. तसेच, अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा आहे. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप नेते कमजोर पडल्यामुळेच दिल्लीतील नेत्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागत आहे. त्यांना इथे केवळ शिवसेनेचे कडवे आव्हान आहे. मात्र, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेऊ, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकरांना खरे तर क्रांतिकारी निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, नियमांनुसार निर्णय घेतला तरी पुरेसे आहे. त्यांनी तसे केले तर आम्ही नार्वेकरांचा शिवतीर्थावर जाहीर सत्कार करू.