
मुंबई | Mumbai
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्लानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पण हल्लेखोरांवर किंवा संशयितांवर बोलण्यावर मात्र त्यांनी टाळलं आहे. प्रकरण तपासाधीन असल्याचं सांगत त्यांनी कुणाचेही थेट नाव घेणं टाळलं आहे. पण शिवाजी पार्क मैदान परिसरात स्टंप घेऊन हल्ला करणार्यांचे 'कोच' कोण हे आम्हांला ठाऊक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
“शुक्रवारी सकाळी मी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघालो होतो. सकाळी शिवाजी पार्कच्या गेट नंबर पाच पाचजवळ असताना माझ्यावर एका व्यक्तीने स्टंपने हल्ला केला. मी मागेवळून बघताच तो माझ्या डोक्यावर स्टंपने हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. मी लगेच माझ्या उजव्या हाताने स्टंप पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीने स्पंटने माझ्या पायावर हल्ला केला. त्यानंतर याठिकाणी उपस्थित लोक माझ्या दिशेने धावून आल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला”, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
हा हल्ल्याचा संशय कोणावर आहे, असं विचारलं असता, “मी मला असलेली माहिती पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. चौकशीपूर्ण झाल्यानंतर मी सविस्तर यावर भूमिका मांडेन”, असेही ते म्हणाले. तसेच “हा संपूर्ण घटनाक्रम बघितला, तर कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही तक्रार केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी एकाला अटक केली. त्याच्यानंतर ४८ तासांत माझ्यावर हल्ला झाला”, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेला आहे. मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. मेंटल बॅलन्स गेलेल्या माणसाला आपली कुणी तरी सुपारी दिल्याचं वाटतं. सतत कोण तरी हल्ला करेल असं वाटत असतं. मग फ्रस्टेशनमध्ये ते शिव्या घालण्याचं काम करतात. आज ते निवडणूक आयुक्तांना शिव्या घालत आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ते न्यायाधीशांनाही शिव्या घालतील. उद्धव ठाकरे मोठे डॉक्टर आहेत. ते जगाला सल्ला देतात. त्यांनी राऊतांवर इलाज केला पाहिजे. माणूस फ्रस्टेड झाला तर अशांना रोग होतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.