राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद आहे - सदाभाऊ खोत

राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद आहे - सदाभाऊ खोत

पुणे | Pune

राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलते करायचे असेल ज्ञानेश्नरांनी जसा रेड्याच्या पाठीवर हात ठेवला होता तसा त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे विधान माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले.

'अर्हम फौंडेशन' आणि 'वास्तव कट्टा' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद: स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी या कार्यक्रमामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बच्चू कडू यावेळी उपस्थित होते. खोत म्हणाले, मंत्र्यांचं निम्मं काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्नरांसारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच अवलाद आहे.

यावेळी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांसमोर आपल्या मागण्या मांडण्याचं व्यासपीठ म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं पाहिजे.

वरच्या सभागृहामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि मी स्वत: तसेच खालच्या सभागृहामध्ये आमदार  बच्चू कडू, आमदार अभिमन्यू पवार यांनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम उचलून धरले. बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी लावून धरला होता. आम्ही सगळे नेते तुमच्या बरोबर आहोत, याचं कारण म्हणजे तुम्ही सगळी मुलं गावखेड्यातील आहे, गावगाड्यातील आहेत. तुमचे आईबाप शेता-मातीत राबून तुम्हाला इकडे पैसे पाठवत असतात आणि तुम्हीही रात्रीचा दिवस करुन मेहनत घेत असतात.

तुम्हाला विशेष सूचना आहे की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय अधिवेशन घ्या. कारण राज्यकर्त्यांना 'डोक्यांची' (मतदार) भीती असते. जिकडे जास्त डोकी असतात तिकडे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्वरांसारखं रेड्यांच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. राज्यकर्ते ही रेड्यांचीच अवलाद आहेत. कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत. म्हणून त्यांना डोकी (मतदार) जास्त दिसली तर तुम्हाला नको असलेलं देखील ते बोलून जातात. शेवटी संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून आपल्याला आपले प्रश्न सोडवून घ्यावे लागतील, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com