सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

विरोधकांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी
सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली

मुंबई (Mumbai)

अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना अटकही झाली आहे. आता या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली आहे. वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा - नारायण राणे

भाजपचे नेते नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

'अमित शहा यांना मी पत्रपाठवून मी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे, ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना पत्र लिहिले आहे' तसेच 'दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या. सचिन वाझेंना या केसेसवर कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता सचिन वाझेंना अटक केली आहे. सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणेंनी केली.

भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न - नाना पटोले

भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. 'महाराष्ट्रला बदनाम करण्याचे एक धोरण हे विरोधकांच्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून याच घडामोडी दिस आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने काय अहवाल दिला आहे, हे ही पाहण्याचे ठरेल. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणानी त्यांच्याकडे आहे. त्यांना काय टेस्ट करायची असेल तर त्यांनी करावी. डबल ढोलकी वाजवायचे काम विरोधक करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही' अशी टीका नाना पटोले यांनी केली.

वाझेंची नार्को टेस्ट करा - राम कदम

सचिन वाझे यांना शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार पाठीशी का घालत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे यांची अटक करावी, ही मागणी केली. पण त्यावरूनही सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले. पण शेवटी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. त्यामुळे सत्ताधारी लोकांचा खरा चेहरा यानिमित्ताने बाहेर पडला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत आहे, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.

पोलीस आयुक्तांना हटवा - भातखळकर

सचिन वाझे यांच्यावर महाराष्ट्र विकास आघाडीची इतकी मेहरबानी का? आणि वाझे यांचे कोणत्या आमदार-खासदार आणि राजकीय पक्षांची नाते आहे हे तपासणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. वाझे यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना क्राईम ब्रँच सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कसे काय घेण्यात आले, याचा सुद्धा तपास होणे गरजेचे आहे. याप्रकरणी चालढकल केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करते जी गाडी वापरण्यात आली तीच गाडी अंबानीच्या घराखाली होती. तसेच या गाडीवरची नंबर प्लेटही खोटी असून त्याचाही तपास करण्यात आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

देशमुखांची हकालपट्टी करा - किरीट सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, मला आशा आहे की सचिन वाझे गँगच्या आणखी सदस्यांची अटक होईल. मुंबई पोलिस आयुक्तांनी 3 दिवस वाझे यांच्याशी काय चर्चा केली? ठाकरे सरकारने पोलिसांना वाझेंच्या संरक्षणासाठी, वाचविण्यासाठी वापरले. त्यामुळे अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com