मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही - सचिन सावंत

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल  नाही - सचिन सावंत

पुणे |प्रतिनिधी|Pune

फडणवीस सरकारच्या काळात आम्ही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकमताने पाठिंबा दिला होता.

तरीही फडणवीस सरकारने आम्हाला तेव्हा विश्वासात घेतले नव्हते. आता भाजपच्या नेत्यांकडून महाविकासआघाडी सरकारची बदनामी सुरु आहे. भाजप नेत्यांचा हा संधीसाधूपणा जनतेला स्पष्टपणे दिसत आहे.

त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे आणि लोकांना फितवण्याचे धंदे बंद करावेत असा टोला लगावतानाच मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नसल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

सावंत म्हणाले, भाजपच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक राज्य सरकारविषयी अपप्रचार सुरु आहे. भाजपमध्ये असणाऱ्या मराठा नेत्यांमध्येच आरक्षणाविषयी एकमत नाही. मात्र, हे मराठा नेते एकमताने लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आरक्षणविषयक बाजू न्यायालयात कशी मांडायची, हेदेखील सरकारला ठाऊक असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

मात्र, राज्य सरकार लढत असलेल्या न्यायलयीन लढाईमुळे भाजपच्या पोटात दुखत आहे. मराठा आरक्षण विषयावर केंद्र सरकार कुठलीच भूमिका घेत नाही. तसेच आरक्षणावर काहीही बोलायला तयार नाही. मराठा आरक्षणावर मोदी सरकारची नेमकी भूमिका काय हेच समजत नसल्याचे सचिन सावंत म्हणाले.

मराठा आरक्षणावर मोदी सरकारची भूमिका काय ? मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पत्र पाठवले आहेत. त्याचे उत्तर देखील त्यांनी दिलेले नाही. मोदी सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाविषयी कुठलीही आस्था नाही. ते याबाबत अनुकूल नाहीत, हे यातून स्पष्ट होत असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच इतर नेते मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका करतात. मात्र, राज्य सरकारने लवकरात लवकर घटना पीठाची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. आणखी काय करायला हवे होते असा प्रश्न सचिन सावंत यांनी विचारला आहे.

भाजपच्या नेत्यांनी आग लावायचे धंदे आता बंद करावेत. गेली पाच वर्ष तुम्ही खोटं बोलत होतात, असा टोला सचिन सावंत यांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त सभासदविषयी विचारले असता, मला याबाबत काही माहिती नाही.

पक्षाचे अध्यक्ष जे ठरवतील ते लवकरच कळेल, माझ्याबाबतीत सांगायचे तर मला जी जबाबदारी पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडतो, असे सचिन सावंत यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com