“गुजरात प्रकल्प नेतोय अन् कर्नाटक...”; रोहित पवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र

रोहित पवार
रोहित पवार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महाराष्ट्र सरकारने सीमप्रश्नी बैठक घेतली. यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेणार आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

“छत्रपती शिवाजीमहाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या याच मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमाभागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे”, असं रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते”, असंही रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सीमाभागातील प्रश्नाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली होती. तसेच सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वय समितीही राज्य सरकारकडून तयार करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटक सरकारने मात्र ४० गावांचा विषय उकरून काढत खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकार कर्नाटकला काय प्रत्युत्तर देते याची प्रतीक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com