
पुणे | Pune
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तीन एकर जमीन एका खासगी विकासकाला देण्याचा घाट घातला होता, असा गंभीर आरोप (Allegation ) केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेवरून विरोधकांकडून अजित पवारांवर निशाणा साधला जात आहे....
अशातच आता अजितदादांची त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पाठराखण करत निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप (BJP) नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचे राजकारण करते, असे म्हणत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता रोहित पवारांनी अजित पवार यांची आयपीएस अधिकारी बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर पाठराखण केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवारांनी पिंपरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचे राजकारण भाजपने सातत्याने केले आहे. अजितदादांची लोकांमध्ये जी इमेज आहे त्याला धक्का देण्याचे काम केले जातं आहे. अचानक हा मुद्दा पुढे येणे, त्यावर लोकांमध्ये चर्चा होणे आणि अजित पवारांना उत्तर द्यावं लागणे हा त्याचाच भाग आहे का हे तपासावे लागेल. भाजपकडून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
तसेच काल या विषयावर बोलतांना रोहित पवारांनी "ज्या अधिकाऱ्यांनी ते पुस्तक लिहीलं आहे, त्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. पण सरकारला वाटत असेल तर त्याची शहानिशा करावी. पण कोणी कुठली जमीन घेतली, काय भ्रष्टाचार केला, कोणी कुठलं पद मिळवलं, कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यावर चर्चा करण्यापेक्षा युवकांवर चर्चा करण्याची गरज आहे. उद्या माझ्यावर चौकशी चालू आहे. माझ्यावर विविध स्वायत्त संस्था, पल्युशन बोर्ड, इन्कम टॅक्सची चौकशी चालु आहे. माझ्यावर चालू आहे तर मग सत्तेत असलेल्या व्यक्तीवर चालू करण्यास काय हरकत आहे असे म्हणत अजित पवारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, आज याच विषयावर बोलतांना रोहित पवारांनी वेगळे वक्तव्य केल्याने त्यांनी अजित पवारांची पाठराखण केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून केल्या जाणाऱ्या या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, "आपण त्यावेळी पालकमंत्री होतो पण बोरवणकरांना तसा कोणताही आदेश दिला नाही. तसेच आपण कधीही चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला नाही. त्यामुळे बोरवणकरांनी जे काही त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे त्याचा आपल्याशी काही संबंध नाही," असे अजित पवाार म्हणाले. तसेच या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे आपण नव्याने तपासली असून त्यामध्ये आपली कुठेच सही नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय कुणी काय म्हणावे याला आपण काही बंधनं घालू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.