भाषणाने मिठी नदी हसली, समुद्र गोड झाला अन् मातीने अश्रू ढाळले

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची बोचरी टीका
भाषणाने मिठी नदी हसली, समुद्र गोड झाला अन् मातीने अश्रू ढाळले

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यादाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने यावेळी जोरदार तयारी केली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान मोदींच तोंड भरून कौतुक करण्यात आलं होत, आणि आता हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यानी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केला आहे.

आज सकाळी ट्विट करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका जुन्या भूमिपूजन कार्यक्रमाची आठवण करुन दिली. तसेच काल मुंबईत झालेला कार्यक्रम हा, “प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय!”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी आज सकाळी दोन ट्विट केले आहेत. त्यापैकी पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, “काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!”

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. “मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!” असा आशयाचे ट्विट करत अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? असा सवालच रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील स्मारकाच्या संदर्भात भाजपवर निशाणा साधला जात आहे, स्वतः नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करूनही भाजपने स्मारक पूर्ण न केल्याने विरोधक त्यावरून टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांनी हल्लाबोल केले असतांना आमदार रोहित पवार यांनी मात्र नवा मुद्दा छेडुन भाजपावर टीका केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com