महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?; सत्तारांच्या 'त्या' विधानावर रोहित पवार संतापले

महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?; सत्तारांच्या 'त्या' विधानावर रोहित पवार संतापले

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. तसेच, सत्तारांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करत आहेत. त्याच विधानावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी कृषी मंत्री यांना टोला लगावत वक्तव्याचा निषेध केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं? असा सवाल उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले की, सामान्य जनतेचा विचार न करता आपला वैयक्तिक 'बदला' घेण्यासाठी कोणी खोक्यांची लेनदेण करून तुम्हाला गद्दारी करण्यास भाग पाडलं व तुम्ही सत्तेचे लाभार्थी झालात.आता कृषिमंत्री झालाच आहात तर वादग्रस्त विधाने करण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून संकटातील शेतकऱ्याला आधी धीर द्या. #जाहीर_निषेध असे निषेधाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.

दरम्यान, याआधीही अब्दुल सत्तार अनेकदा वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती होती. तर, जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. तर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. केवळ तीन महिनेच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांचे मंत्री अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com