Friday, April 26, 2024
Homeराजकीयलसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुभा देण्याचा विचार - उपमुख्यमंत्री

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुभा देण्याचा विचार – उपमुख्यमंत्री

पुणे (प्रतिनिधि) / Pune – लसीचे दोन्ही डोस ज्यांना देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार असून हे माझे वैयक्तिक मत आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंबंधी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: ही मागणी दुकानांच्या आणि पर्यटनाच्या बाबतीत केली जात आहे. पण बाधितांच्या संख्येत म्हणावी तशी अपेक्षित घट झालेली नसून, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. अजित पवारांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना नागरिकांवरील निर्बंधाबाबत मत मांडले.

- Advertisement -

पवार म्हणाले, काही जणांचे म्हणणे आहे की येथून पुढे १०० ते १२० दिवस खूप म्हत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांनी नियमावलीच तंतोतंत पालन करायला पाहिजे. पण, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विनामास्क नागरिक फिरत असल्याचे चित्र आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते, त्यामुळे सर्वानी नियम पाळले पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर आरोग्य विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते. राज्यातील बहुतांश भागांत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली, असली तरी १० जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या जास्त आहे. गेल्या काही आठवडयांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन आलेख हा ७ ते ८ हजारांच्या दरम्यान स्थिरावला आहे. पण तो ५ हजारांपेक्षा कमी होणे अपेक्षित असताना तसे होऊ शकलेले नाही, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले होते. तसेच केंद्रीय पातळीवरून तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत इशारा देण्यात आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली असली तरी तूर्त ते कायम राहतील, असे संकेत देण्यात आले होते.

एकदम बातमी पुढं आली याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरत आहे

प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी मिळाली पाहिजे. एखाद्या व्यक्तीमुळे देशाच्या सुरक्षतेला धोका निर्माण होत असेल किंवा देशद्रोही काम होत असेल याबाबत त्या त्या देशाचा अधिकार आहे की बारकाईने या गोष्टी पुढं आणल्या पाहिजेत. नियम आणि कायदे केले जातात आणि त्याचा आधार घेऊन निष्पाप लोकांना भरडलं जात असल्याच्या अशा अनेक घटना देशात पुढे आल्या आहेत. याबाब सत्ताधारी पक्षाचं वेगळं मत आहे तर विरोधी पक्षाची वेगळी भूमिका आहे. एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.

एकदम बातमी पुढं आली याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरत आहे. आज पार्लमेंट चालू आहे. त्या माध्यमातून देशातील सव्वाशे कोटी जनतेला नक्की काय झालं आहे? हे कोणाच्या काळात झाल आहे? कोण जबाबदार आहे? कोणी आदेश दिले आहेत? हे कळलं पाहिजे, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपल्यातील महत्वाच्या लोकांबद्दल माहिती परदेशात गेली तर देशाला आणि त्या व्यक्तीला देखील धोका आहे. त्यामुळे या गोष्टीत राजकारण न आणता विरोधी पक्षानेदेखील हे अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं देखील अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या