चव्हाण-फडणवीस कथीत राजकीय भेटीवर दानवेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले,...

चव्हाण-फडणवीस कथीत राजकीय भेटीवर दानवेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले,...

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदार फोडल्यानंतर राज्यात एकच भूकंप घडला होता. शिवसेनेपाठोपाठ (Shiv Sena) काँग्रेस (Congress) पक्षालाही बंडाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

यावर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आता अशोक चव्हाण यांची चर्चा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली होती. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात.'

तसेच, 'देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. त्यांच्यामध्ये असंतोष असेल तरी त्याचा आम्ही आता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल उपयोग होईल. तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ,' असे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण या दोन्ही नेत्यांनी या कथीत राजकीय भेटीबाबत कानावर हात ठेवले आहेत. या भेटीचे वृत्त फेटाळून लावत अशा प्रकारे कोणतीही भेट झाली नसल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कथीत भेटीच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असला तरी राजकीय वर्तुळात मात्र ही चर्चा वेगवेगळ्या अर्थाने सुरुच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com