राज्यातील सरकार म्हणजे एक नवरा अन् दोन बायका

राम शिंदे : दुध आंदोलनवेळी केली खरमरीत टीका
राज्यातील सरकार म्हणजे एक नवरा अन् दोन बायका

कर्जत|तालुका प्रतिनिधी|Karjat

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे एक नवरा आणि दोन बायका. यामध्ये देखील नवरा बसलाय कोपर्‍यात, यामुळे शेतकरी देशोधडीला लागला अशी खरमरीत टीका राज्याचे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दूध प्रश्नावर भाजपने केलेल्या आंदोलनाच्या वेळी केली.

महायुतीच्या वतीने शनिवारी नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर दूध ओतून माजी मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर. पप्पू धोधाड, रवींद्र कोठारी, नंदलाल काळदाते, सरपंच प्रकाश कदम, सुनील यादव, संतोष कुरळे, राजेंद्र गायकवाड, दीपक काकडे, अशोक शिंदे, मेजर हाके यांच्यासह यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते

यावेळी बोलताना शिंदे यांनी आघाडी सरकारवर प्रखर टीका करताना राज्यातील हे आघाडी सरकार नसून तिघाडी सरकार आहे. यांचा कारभार म्हणजे एक नवरा व दोन बायका यांचा अडचणीतील संसार आणि यामध्ये नवरा कोपर्‍यात बसलेला, अशी अवस्था झाली आहे. करोनामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे.

यामुळे या सरकारची कान उघाडणी करण्यासाठी महायुतीच्यावतीने नगर-सोलापूर महामार्गावरील माहिजळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. यावेळी शिंदे पुढे म्हणाले, दुधाला भाव नाही विजेचे लोड शेडींग सुरू आहे. खतासाठी शेतकरी रांगा लावत आहेत, अशी गंभीर परिस्थिती राज्यात विविध राज्यातील मंत्री मात्र घरात बसून कारभार करीत आहेत आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत.

भाजप सरकारच्या काळामध्ये दुधाला 25 ते 30 रुपये दर देण्यात आला होता. दूध पावडर अनुदान देण्यात आले होते व शेतकर्‍यांना पाच रुपये थेट अनुदान जाहीर केले होते. या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून दिले आहे, दुधाचे भाव कोसळले आहेत. अतिरिक्त पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, अशी परिस्थिती असताना सरकार मात्र डोळे झाकून गप्प आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी महायुती रस्त्यावर उतरली आहे, असेही शिंदे म्हणाले. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांना शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले.

शिंदे यांच्यासह 38 जणांविरुद्ध गुन्हा

माहिजळगाव आंदोलनप्रकरणी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह 38 जणांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर ते सोलापुर महामार्गावर माहिजळगाव चौक आंदोलनाची परवानगी नसताना जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

माजी मंत्री शिंदे, प्रसाद ढोकरीकर, अंगद ढोकरीकर, अशोक खेडकर, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब निंबाळकर, प्रकाश शिंदे, सुरेश भिसे, मलठण, भानुदास हाके, किशोर कोपनर, रावसाहेब कदम, प्रकाश कदम, मच्छिंद्र खेडकर, सतिष शिंदे, संतोष घोडके, सतिष काळे, कल्याण जाधव, पप्पु शिंदे, बाळासाहेब भंडारी, आप्पा कदम, राजेंद्र शिंदे, रमेश व्हरकटे, शरद जाधव, बापु शिंदे, नंदलाल काळदाते, विजय भोसले, अशोक शिंदे, व इतर 5 ते 10 लोकांनी शनिवारी सकाळी साडेनऊ ते पावणे दहा वाजेपर्यंत एकत्र जमून रस्ता अडवुन रस्त्याच्या मध्येभागी बसून जाणार्‍या येणार्‍या वाहतुकीस अडथळा निर्माण करुन वाहतुक थांबवली.

करोनाचा प्रादुर्भाव होईल याची जाणीव असताना या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द भादवि कलम 341,188,269,270 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com