
मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई लागलेल्या पोस्टवर चक्क छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्या पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील आक्रमक झालेत. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अती उत्साही कार्यकर्त्यांना आवरा ! असा खोचक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली शहर शाखेबाहेर साकारण्यात आलेला देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘३५० वर्षानंतर .. पुन्हा तोच योग' या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे. यावरून आता मनसे आमदार पाटील यांनी ट्विट करत खोचक सल्ला दिला आहे.
कोणी स्वतःलाच 'जाणता राजा' म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा, अशी सूचना करत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या ट्विटमध्ये मेन्शनही केलंय. त्यासोबतच, व्हिडिओही शेअर केला आहे.