Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराजनाथ सिंह यांनी माफी मागावी - संभाजी ब्रिगेड

राजनाथ सिंह यांनी माफी मागावी – संभाजी ब्रिगेड

पुणे |प्रतिनिधी| Pune

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आणि त्याचा निषेध करत राजनाथ सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही निषेध केला आहे.

- Advertisement -

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून बालशिवाजींना शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक झाले असे वक्तव्य राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात केले होते. वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

राजनाथ सिंहांनी चुकीचा इतिहास सांगून अज्ञान दाखवलं

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी गॅंग आहे”

“राजनाथ सिंग यांनी सुद्धा खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाची गद्दारी करू नये”, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिग्रेडने मांडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे आजपर्यंत कोणीही लिहिले किंवा सांगितले नाही. हा खोटारडेपणा वेळेत थांबवा. राजनाथ सिंग यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तमाम शिवप्रेमींची तात्काळ माफी मागावी अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यता अमोल कोल्हे यांनी वर्तवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या