मुंबई l Mumbai

महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यातच महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच करोना लसीचा साठा शिल्लक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या करोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. दरम्यान 'एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला फटका बसला आहे', अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबतच, त्यांनी राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊन मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कसं कमी आहे, त्याविषयी देखील पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले की, 'ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत', असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

तसेच, 'राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊनही मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख असून अशा परिस्थितीत आम्हाला फक्त साडे सात लाख लशीचे डोस का?, असा सवाल राजेश टोपे यांनी केंद्राला केला आहे. राज्यात आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच, राज्यातील लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु राहिलं,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर, 'महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय हे सांगितलं जातंय हे चुकीचं आहे. महाराष्ट्राकडे दीड दिवसाचा लसीचा साठा आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते हे चुकीचं आहे. राज्याला १५ एप्रिलनंतर मिळणारा साडे सात लाखाचा लसींचा स्टॉक वाढवून १७ लाख दिले आहेत. मात्र, हा साठाही महाराष्ट्रासाठी अपुराच आहे. असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

१८ ते ४५ हा वयोगट कामासाठी जास्त फिरणारा वयोगट आहे. त्यामुळं त्यांना जास्त संक्रमणाची भीती आहे. त्यामुळं या वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन?

राज्यात करोना लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दावे गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्र सरकारकडून केले जात होते. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात फक्त ३ दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती ७ एप्रिलला सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. राज्य सरकारच्या या दाव्यांवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.

'एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे आख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसला आहे', अशा शब्दांत हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ''महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली असून त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत', असं देखील हर्ष वर्धन यांनी या पत्रकात म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी एक परिपत्रकच पोस्ट करत त्यातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

'गेल्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरून केलेली वक्तव्य ऐकली. हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठीचाच प्रयत्न आहे. या संदर्भात जबाबदारीने वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भिती निर्माण केली जात आहे. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात असून त्यासंदर्भात राज्य सरकारांना देखील माहिती दिली जात आहे.

त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत', असं हर्ष वर्धन यांनी या पत्रकात म्हटलं आहे. 'आज राज्यात फक्त सर्वाधिक करोनाबाधित आणि सर्वाधिक कोविड मृत्यूच नाहीत, तर जगभरातील सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात चाचण्या घेण्याचं प्रमाण हे अपुरं आहे. शिवाय, त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील अपेक्षेइतकं नसल्याचं' हर्ष वर्धन यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

'आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण करण्यात देखील महाराष्ट्र सरकारची कामगिरी फारशी चांगली नाही. महाराष्ट्रानं आत्तापर्यंत फक्त ८६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्यासोबतच फक्त ४१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचा विचार करता महाराष्ट्रानं आत्तापर्यंत फक्त ७३ टक्के कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ४१ टक्के कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला आहे. त्यासोबतच राज्यातल्या फक्त २५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लस देण्यात महाराष्ट्राला यश आलं आहे', असं म्हणत इतर राज्यांमध्ये या पेक्षा जास्त प्रमाण असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं.