मराठी पाट्यांचे श्रेय उद्धव ठाकरेंना नाही तर माझ्या...

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी (Marathi) भाषेत असावे, असा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला होता. अन्य भाषांमध्ये नामफलक (Nameplate) लावता येतील, मात्र अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा चालणार नाही, असेदेखील स्पष्ट करण्यात आले. मराठी भाषेसाठी आंदोलने करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे...

राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पत्र शेअर केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करून नये. त्यावर अधिकार आहे फक्त महराष्ट्र सैनिकाचाच. महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com