मनसे भाजपाविरूद्ध लढणार? राज ठाकरेंचं नागपुरात सूचक विधान

राज ठाकरे
राज ठाकरे

नागपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप-मनसे युती होणार अशा चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेच्या युतीबद्दल मोठं विधान केले आहे. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, हा विदर्भ सर्वात पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आज जर हा भाजपाचा बालेकिल्ला झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहूनच अनेक पक्ष मोठे होतात. प्रत्येक ठिकाणी अनेकांना प्रस्थापितांच्या विरोधातच उभं राहावं लागतं. त्यामुळे जर नागपूरात जर बाजप प्रस्थापित असतील तर, त्यांच्या विरोधातच लढावं लागेल असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

तसेच नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही सांगितले. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर १६ वर्षे झाली तरी विदर्भात पक्षाचं अस्तित्व नाही. ज्या गतीने पक्ष विस्तार व्हायला हवा होता, तसा विस्तार झाला नाही. विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल, असं राज ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com