राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र, केले 'हे' आवाहन

राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र, केले 'हे' आवाहन

मुंबई l Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसेची (MNS) भूमिका काय असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १३ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होता. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीचं पत्र काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

उद्या होणारा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही राज यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केली आहे. पावसाळ्यात नागरिकांना मदत आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी,

सस्नेह जय महाराष्ट्र

तुम्हाला जरा थोड्या तातडीने कळवतो आहे.

आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचं थैमान घाललेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.

अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच थोडा पावसाचा अंदाज घेऊन तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक राहत आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली-कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुद्ध पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावं लागेल. मुख्यत: वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुले ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात ती नंतर पुन्हा लावावी लागतील अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.

अर्थात असं काही होऊ नये, कुठलेही नैसर्गिक संकट येऊ नये ही आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितले.

लवकरच भेटू..

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com