
पुणे | Pune
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज (दि. १९ ऑगस्ट) रोजी त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांच्या सद्यस्थितीवर भाष्य करत भाजप (BJP) सरकारवर टीका केली...
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पत्रकारिता (Journalism in Maharashtra) आजही जिवंत आहे. मीही पत्रकारितेत काम केले आहे. मार्मिकमध्ये ब्लॉक लावण्याचे काम केले. तिथपासून ते आतापर्यंतच्या वृत्तपत्राच्या छपाईपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. पत्रकारिता पाहिली नाही. तर,अनुभवली आहे. पत्रकारितेतून राजकारणात आलो. आताची पत्रकारिता बघत आहे. पत्रकारिवेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नका, मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता असे राज ठाकरेंनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारांनी महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे, लिहावे. आज अनेक पत्रकार वाया गेले आहेत. तेच महत्त्वाच्या हुद्यावर बसले आहेत. पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. पूर्वी लपूनछपून करत होते. आता उघडपणे काम करत आहेत. हे लेबल लावलेले पत्रकार परिषदेत येतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात. हे काय म्हटला आणि तो काय म्हटला असेच प्रश्न विचारत आहेत. राजकारणाचा (Politics) स्तर, भाषा बदलली आहे. तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात. तुम्ही नाही दाखविल्यावर स्वच्छतागृहात बोलतील का, असे राज ठाकरेंनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. ज्या दिवशी सत्ता येते, त्या दिवसापासून सत्ता जाते. मला म्हणतात तुमच्या सभेला गर्दी होते. पण, मते मिळत नाहीत. पण, २००९ मध्ये १३ आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते काय, लोकसभेला उमेदवारांना लाखावर मते पडली होती. पण, प्रत्येकाचा काही काळ असतो. सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा होत होत्या. पण, मते किती पडत होती. त्यावेळी काँग्रेसशिवाय काय पर्याय होता. त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पूर्वी पत्रकारांसाठी (Journalists) लढणाऱ्या भाजप पक्षाच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत, ही चिंताजनक बाब असून भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलघडून पाहावा,असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.