Sunday, May 5, 2024
Homeराजकीयराजकीय नेत्याच्या बदनामीसाठी धाडी

राजकीय नेत्याच्या बदनामीसाठी धाडी

मुंबई । प्रतिनिधी

उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या चौकशीच्या आधारे सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला.

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने धाड टाकली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सीबीआयवर राजकीय उद्दिष्टे साध्य करत असल्याचा आरोप करताना धाडीचा निषेध केला.

अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला. तसेच सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. या संदर्भात एकूण चार जणांची चौकशी झाली आणि चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच जयंत पाटील यांनी उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते, याकडे लक्ष वेधले. प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले आणि याचा अहवाल न्यायालयात मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, असे सांगितले.

ॲन्टीलियाजवळ सापडलेली स्फोटके आणि हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीच्या संदर्भात मिळालेल्या परवानगीचा दुरुपपयोग सीबीआय करत आहे, आरोपही जयंत पाटील यांनी लगावला.

आघाडी सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न

दरम्यान, सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. यातून सत्य बाहेर येईल आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या