Friday, April 26, 2024
Homeराजकीयराहुरी तालुक्यात 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राहुरी तालुक्यात 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात तब्बल 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

- Advertisement -

वर्षभराच्या विसाव्यानंतर तालुक्यात पुन्हा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पारावरच्या गप्पांना पुन्हा उजाळा मिळू लागला आहे.

तालुक्यात 82 ग्रामपंचायतींत आरक्षण निघणार असून त्यातील 50 टक्के जागा महिलांसाठी असल्याने अनेक ग्रामपंचायतींवर प्रथमच महिलाराज अवतरणार आहे.

तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वांबोरी, राहुरी खुर्द, उंबरे आणि तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गावोगावच्या इच्छुकांनी जोरदार राजकीय फिल्डिंग लावली आहे.

दरम्यान, बहुतांशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व त्यांचे पारंपरिक विरोधक माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या गटातच सामना रंगणार असून काही ग्रामपंचायतींत विखे-कर्डिले गट व स्थानिक गटांची लढत पहायला मिळणार आहे. काही गावांत चौरंगी, तिरंगी तर दुरंगी लढत होणार आहे.

वांबोरीसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत दुरंगी तर राहुरी खुर्द व उंबरे ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होणार असल्याचे संकेत आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणाच्या जुळवाजुळवीला प्रारंभ झाला आहे. 15 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत होताच निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. दि.23 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज घेतले जाणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे.

दि. 4 जानेवारी 2021 रोजी अर्ज माघारीची संधी दिली जाणार आहे. 15 जानेवारी 2021 रोजी संबंधित 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन गावच्या सरपंचांसह राहुरी तालुक्यातील नेत्यांसह इच्छुकांचे भवितव्य समजणार आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चांदेगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहीरे, दवणगाव, धानोरे, गणेगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, जांभूळबन, वावरथ, कणगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर, खडांबे बु, कोळेवाडी, कोपरे, शेनवडगाव, कुक्कढवेढे, कुरणवाडी, लाख, मल्हारवाडी, पाथरे खु, पिंपळगाव फुणगी, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदूळनेर, तिळापूर, वडनेर, वळण, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी या गावातील निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.

15 जानेवारी रोजी निवडणूक होणार असल्याने आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दि.15 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडतीचे नियोजन आहे. यामध्ये अनूसुचित जाती प्रवर्गासाठी 11 जागा राखीव आहेत. यामध्ये 6 महिलांसाठी जागा आहेत. तसेच अनुसूचित जमातीमध्ये 82 पैकी 10 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 5 महिलांना स्थान देण्यात आले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 जागा राहणार आहेत. त्यामध्ये 11 महिला असणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 39 जागा असून 19 जागेवर महिला असणार आहेत. याप्रमाणे राहुरी तालुक्यात सर्वच प्रवर्गामध्ये महिलांना संधी असल्याने राहुरी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींपैकी निम्या ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या